रत्नागिरी - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश, मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रत्नागिरीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
परतीच्या पावसानं कोकणातील भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. कापलेली धान पाण्यात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये यामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा असे आदेश रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना आपण दिले असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान त्यांनी यावेळी राज्यात विद्यापीठाकडून सुरू असलेल्या परीक्षांवर देखील प्रतिक्रीया दिलीये. विद्यापीठ परिक्षांच्या तांत्रिक घोळाबाबत रश्मी करंदीकर यांच्यांशी चर्चा केलीय. पण, या साऱ्यामध्ये कोणताही विद्यार्थी परीक्षेविना राहणार नाही. कुणाचंही नुकसान होणार नाही. परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातील अस त्यांनी म्हटलंय. राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य भूमिका घेतील. त्यासाठी सारखी आंदोलनं करण्याची गरज नाही. राजकारण करताना ते मतांचं राजकारण करू नये असं म्हणत त्यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.