रत्नागिरी - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका एसटी महामंडळालाही बसला. एसटी विभागाची आर्थिक घडी पुरती विस्कटली. ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने २१ मेपासून मालवाहतूक सेवा सुरू केली. या मालवाहतूक सेवेला कारखानदार व व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत रत्नागिरी एसटी विभागाला तब्बल दोन कोटीं रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली आहे.
कोरोनाचा एसटीला फटका
कोरोना महामारीचा मोठा फटका तोट्यात असलेल्या एसटी महामंडळालाही बसला. सहा महिने राज्यातील सर्व एसटी सेवा ठप्प होती. याचा मोठा आर्थिक फटका एसटी सेवेला बसला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि काही एसटीमध्ये संरचनात्मक बदल केले.
एसटी मालवाहतुकीची वैशिष्ट्ये
या मालवाहतूक सेवेला जिल्ह्यातील कारखानदार, व्यापारी, शेतकरी आदींनी पसंती दिली आहे. आतापर्यंत रत्नागिरी एसटी विभागातून ५० मालवाहतूक गाड्यामधून मालवाहतूक केली जात आहे. एसटीने होणारी वाहतूक अधिक सुरक्षित आहे. तसेच प्रशिक्षित वाहनचालकांमार्फत ही सेवा दिली जात आहे, ही सेवा सेवा माफकदरात उपलब्ध असल्याने अनेकांची पसंती या मालवाहतुकीला असल्याचे मेहतर यांनी सांगितले.
आंबा, काजू, खत, चिरे, सिमेंट वाहतूक
सुरुवातीला जिल्ह्यातील आंबा या एसटीच्या मालवाहतुकीमधून पाठविण्यात आला. त्यानंतर काजू, खत, रोपे, सिमेंट, चिरा, एमआयडीसीतील माल यांची वाहतूक रत्नागिरी विभागातून करण्यात आली आणि सध्याही सुरू आहे. खासगी वाहतुकीच्या तुलनेत ही वाहतूक स्वस्त पडते, त्यामुळे अनेक व्यापारी, कारखानदार, शेतकरी एसटी मालवाहतुकीला पसंती देत असल्याचे ते म्हणाले.
एसटीच्या उत्पन्नात भर
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यातून माल घेऊन एसटीचे मालवातूक ट्रक जयगड बंदरात दाखल होतात. हा माल उतरवल्यावर तेथील एका गोदामातून खत घेऊन रत्नागिरीत आले. त्यानंतर रत्नागिरीतून पुन्हा सांगलीला जाताना या ट्रकमधून सिमेंट, चिरा आदींची वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडत असून, रत्नागिरी एसटी विभागाला 2 कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याचे मेहतर यांनी सांगितले. त्यामुळे तोट्यातील एसटीला मालवाहतुकीने हातभार लावल्याचे पाहायला मिळत आहे.