रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक विकासाची कामे ठप्प आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही या लॉकडाऊनमुळे ठप्प आहे. मात्र, पावसापूर्वी महामार्गावरील काही ठिकाणचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता, या महामार्गाचं काम पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे राऊत म्हणाले.
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराना तशा ऑर्डर्स दिल्या असून, काही ठिकाणी काम सुरूही झालं असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. तसेच या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बैठक लावण्यात आलेली आहे. तसेच रस्त्याच्या कामाबरोबरच जी पुलांची कामे अर्धवट राहिली आहेत, त्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून शास्त्री नदीवरील पूल तसेच वाशिष्ठी नदीवरील पुलाला टॉप प्रायोरिटी देण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.