रत्नागिरी - राज्यातील महाविकास आघा़डी सरकार पडेल, पण रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही. भाजपाची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसूचना निघेल, हे भाजपचे आश्वासन असल्याचे माजी आमदार तसेच भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी म्हणत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागला आहे.
सध्या रिफायनरीचा विषय कोकणात गाजत आहे. एकीकडे, या प्रकल्पाला समर्थन वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक जमीनदार स्वतःहून पुढे येत या प्रकल्पाला समर्थन देत आहेत. शिवसेनेचेसुद्धा अनेक स्थानिक पदाधिकारी या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. राजापूर तालुका बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेत प्रकल्पसमर्थकांच्या भावना मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांपर्यंत पोहचविण्याची मागणी केली, तसेच साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रेही आव्हाड यांना सादर करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार तथा भाजपा चिटणीस प्रमोद जठार यांनी अभिनंदन करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
याबाबत जठार म्हणाले, 'सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नाणार हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले आहे. मात्र, कोकणी जनतेच्या बरोजगारीचा विषय संपलेला नाही. सामंतजी तुमचे सरकार एकवेळ संपेल, मात्र कोकणातला नाणार रिफायनरी प्रकल्प जाणार नाही, हे लक्षात ठेवा, असे जठार यांनी सांगितले. ज्या दिवशी आघाडीचे सरकार पडेल, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसतील, आणि दुसऱ्याच दिवशी या प्रकल्पाची पुन्हा अधिसूचना जाहीर होईल, हे आमचे जाहीर आश्वासन असल्याचे सांगत जठार यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. दीड लाख लोकांचा रोजगार शिवसेनेने हिरावून घेऊ नये, असेही जठार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - 'जनतेच्या जीवापेक्षा सरकार कंपन्यांचे हित जपतेय', निलेश राणे यांचा आरोप