रत्नागिरी - संवाद माध्यमाची क्रांती इतक्या वेगाने झाली आहे की, आज आपल्याला कुणाशीही एका क्षणात संपर्क साधता येतो. एखाद्याच्या तब्येतीबद्दल विचारायचे असल्यास, ती माहिती एका क्लिकवर कळते. पण आधीच्या काळात फक्त पोस्टकार्ड म्हणजेच पत्राद्वारे संवाद साधता येत होता. हेच पोस्टकार्ड आज 140 वर्षांचे झाले आहे. जिल्ह्यातील एक पोस्टकार्डप्रेमी निवृत्त शिक्षक तब्बल 55 ते 60 वर्षांपासून या पोस्टकार्डचा वापर करत आहेत. आजही त्यांनी पोस्टकार्डच्या आठवणींचा ठेवा जपून ठेवला आहे.
आज आपल्याला मोबाईल, इमेल, व्हाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, एसएमएस यांद्वारे मैलोन मैल दूर असलेल्या आपल्या नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींशी एका क्षणात संदेशाची देवाणघेवाण करता येते. मात्र, कधी काळी याच कामासाठी पोस्टकार्डचा वापर केला जात होता. यासाठी पोस्टमनची वाट पाहिली जात होती. आज हेच पोस्टकार्ड 140 वर्षांचे झाले आहे.
ब्रिटिश इंडिया कंपनीने दळणवळणाचे साधन किंवा एकमेकांचे निरोप पोहोचविण्यासाठी 1 जुलै 1879 रोजी पाव आणे किंमतीचे पोस्टकार्ड सुरू केले होते. हे पोस्टकार्ड आयताकृती आणि ठराविक जाडीचे होते. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पोस्टकार्डद्वारे पाठवलेला संदेश त्यावेळी टांगा, बैलगाडी किंवा रेल्वेने पोहचविला जात होता. त्यानंतर 1880 मध्ये हे पोस्टकार्ड सर्व सरकारी कार्यालयांमध्ये वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यावेळी पोस्टाच्या एका विभागात दिवसाला जवळपास बाराशे ते पंधराशे पोस्टकार्ड येत होती. मात्र, सध्या पोस्टकार्ड येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पोस्टाच्या सेवेला सुरुवात होऊन 140 वर्ष झाली आहेत. मात्र, आजही एका पोस्ट कार्डची किंमत फक्त ५० पैसे इतकीच आहे.
आज परिस्थिती बदलली आहे. मात्र, तरीही काही लोकांना पोस्टकार्डबद्दल प्रेम आहे. रत्नागिरीतील निवृत्त शिक्षक सुभाष भडभडे हे त्यातील एक आहेत. गेली 55 ते 60 वर्ष ते पोस्टकार्डचा वापर करत आहेत. पुस्तकांवर अपार प्रेम असलेले भडभडे यांना एखाद्या लेखकाचे पुस्तक आवडले तर पोस्टकार्डद्वारे आपला अभिप्राय त्या लेखकाला कळवत होते. त्यानंतर तो या लेखकही पोस्टकार्डद्वारे भडभडे यांचे आभार मानत होता. पु. ल. देशपांडे, वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, व.पु.काळे, रणजित देसाई, ना.सी.फडके अशा अनेक नामवंत विभूतींनी भडभडे यांचे पोस्टकार्डद्वारे आभार मानले आहेत. भडभडे यांनी हा ठेवा आजही जपून ठेवला आहे.