रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या चिपळूण येथील एकाच ठेकेदारास वाळू उत्खननाचा परवाना मिळाला आहे. मात्र, बाकी ठिकाणच्या काही नदीपात्रांमध्ये परवानगी नसतानाही अनधिकृतपणे वाळू उत्खनन सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील गांग्रई खाडी भागातही अशाच प्रकारे अनधिकृतपणे बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. हातपाटीद्वारे हे वाळू उत्खनन सुरू आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अनधिकृतपणे सुरू असलेल्या या वाळू उत्खननाकडे स्थानिक महसूल प्रशासन मात्र कारवाई न करता सोयिस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.
गांग्रई खाडी भागात अवैधरित्या बेसुमार वाळू उत्खनन; काही महिन्यांपासून गांग्रईत अवैधरित्या वाळू उत्खनन-गेल्या काही महिन्यांपासून गांग्रई नदीपात्रात हातपाटीद्वारे बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. परवानगी नसतानाही जवळपास 15 ते 20 बोटींच्या सहाय्याने हे वाळू उत्खनन सुरू आहे. अगदी गांग्रई जेटीसमोरून या बोटी वाळू उत्खनन करताना निदर्शनास येतात. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून राजरोसपणे हे वाळू उत्खनन सुरू आहे. गांग्रई खाडी भागात अवैधरित्या बेसुमार वाळू उत्खनन प्रशासनाची सोयिस्कररित्या डोळेझाक ?मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुरू असलेले हे वाळू उत्खनन स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना मात्र दिसत नाही का? बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? की सोईस्कररित्या बेकायदेशीर वाळू उपशाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे सवाल स्थानिकांमधून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान स्थानिक महसूल प्रशासनाला याची माहिती देऊनही ते कारवाई करत नसल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आता जिल्हा महसूल प्रशासन आणि खनिकर्म विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.