रत्नागिरी- नाणार ग्रीन रिफायनरीचा अध्यादेश रद्द झाला असला, तरी हा प्रकल्प याच ठिकाणी व्हावा यासाठी आता समर्थक एकवटले आहेत. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात नियोजित ठिकाणीच व्हावा, अशी मागणी समर्थकांनी केली आहे. यासाठी 20 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कोकण विकास समितीने आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी जिल्ह्यातील व्यापारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
स्थानिकांचा विरोध लक्षात घेता राजापूर नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रायगड येथे हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच व्हावा, अशी मागणी आता पुढे येताना दिसत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल, असा दावा या समितीने केला असून. यामुळे ग्रीन रिफायनरीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तीन लाख कोटी एवढी गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये उभारणी ते उत्पादन प्रक्रियेपर्यंत सुमारे दोन लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रकल्पाला लागणाऱ्या नागरी सेवा सुविधांमुळे रोजगाराला भरपूर वाव मिळेल. उत्तम दर्जाच्या शाळा, महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि मोठ मोठ्या रुग्णालयांची उभारणी याच माध्यमातून होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा लाभ स्थानिकांनाच होईल, असे कोकण विकास समितीचे म्हणने आहे.यासाठी 20 जुलैला समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. राजापूरमधील हजार ते दीड हजार प्रकल्पग्रस्त यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती कोकण विकास समितीचे अविनाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या प्रकल्पासाठी 7 हजार 500 एकरवरच्या जमीन मालकांनी संमती पत्र दिली असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.