रायगड (पनवेल) - पनवेल महानगरपालिकेच्या महापौर, डॉ. कविता चौतमोल यांचा महापौर पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात महापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महापौर पद पुढील अडीच वर्षांसाठी महिला खुल्या वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे महिला नगरसेविकांकडून महापौर पदासाठी जोरदार 'फिल्डिंग' लावण्यात येत आहे. दरम्यान, पनवेलचा पुढचा महापौर हा खारघरमधलाच हवा, अशी मागणी सर्वसामन्यांमधून होत आहे.
यंदाचे पनवेलचे महापौर पद खुल्या वर्गातील महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर आधीपासूनच देव पाण्यात ठेवलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. परंतु पुन्हा एकदा महिलाच पनवेल पालिकेचा कारभार सांभाळणार असल्याने बहुमताची सत्ता असलेल्या भाजप मधील खुल्या वर्गातील महिला नगरसेविका सक्रिय झाल्या आहेत. यात महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांच्यासह नगरसेविका नेत्रा पाटील, संजना कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
खारघर शहराला विकासाची गती मिळेल, या आशेने खरघरवासीयांनी ठाकूर पिता-पुत्रांवर विश्वास ठेवत खारघरमधल्या १२ पैकी १२ नगरसेवकांना निवडून दिले. सिडको आणि महापालिकेला योग्य समन्वय नसल्यामुळे खारघरचा विकास खुंटला आहे. त्यामुळे आता पनवेल महापौरच्या रूपातून खारघरमधलं नेतृत्व जर आले तर खारघरमधला खुंटलेला विकास जोर धरू लागेल, अशी आशा खारघरकरांना लागली आहे. यंदाचे पनवेल महापौर पद खारघरमधून मिळाले तर पुढच्या महापालिका निवडणुकीत याचा फायदा भाजपला होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृह नेते परेश ठाकूर हे महापौर निवडीची अंतिम चर्चा करूनच तसा प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविणार आहेत. दरम्यान, अद्यापपर्यंत याबाबत भाजप गोटात उघडपणे कोणत्याही उमेदवाराच्या नावाची चर्चा नसली तरी महिला नगरसेविका त्यांचे पती आपल्या परीने या पदासाठी लॉबिंग करीत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र ज्या पद्धतीने पहिल्या वहिल्या महापालिका निवडणुकीतच ठाकूर पिता-पुत्रांवर विश्वास खारघरने बाराही नगरसेवक निवडून दिले, आता त्याची परतफेड म्हणून खारघरवासीय पनवेलच्या महापौरपदाचा हट्ट करताना दिसत आहे. यामुळे आता ठाकूर पिता-पुत्र खारघरकरांचा हा हट्ट पूर्ण करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - रायगडात नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांसह स्थानिक जमले समुद्रकिनारी
हेही वाचा - पेण पंचायत समिती सभापती सरिता म्हात्रे, तर उपसभापती पदी सुनील गायकरांची बिनविरोध निवड