रत्नागिरी - गेल्या वर्षी कोकणाला निसर्ग चक्रिवादळाचा फटका बसला होता. त्याची मदत अजूनही कोकण वासियांना मिळालेली नाही. त्यामुळे आतातरी सरकारने ही नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने घेतली पाहिजे. नुसत्या घोषणा करून चालणार नाही, सरकारने अधिक संवेदनशीलपणे काम करणं गरजेचं असल्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. तसेच सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोरजे येथे चक्री वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेल्या वीज वाहिन्याच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या दाम्पत्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
ही दूर्घटना बोरज जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सोमवारी घडली होती. बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दुचाकीने लोटे येथे गेले होते. लोटे येथील काम संपवून ते सायंकाळी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांची दुचाकी जि. प शाळा बोरज येथे आली असता वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेला ३३ केव्ही वीज वाहिनीचा जबरदस्त धक्का या दोघांना बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि प्रवीण दरेकर खेड बोरज येथे कुटुंबीयांची भेट घेतली.
याशिवाय तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस करणार आहेत. तसेच, भाजपा व अंत्योदय प्रतिष्ठानच्या ऑक्सिजन प्रोजेक्टचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. या दौऱ्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस खेड, चिपळूण नंतर हातखंबा, निवळी, मिरकरवाडा, किल्ला या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पावस आणि राजापूर दौरा करून, पुढे सिंधुदुर्गला जाणार आहेत.