रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. सरकारने बहाने न सांगता योग्यप्रकारे मदत केली पाहिजे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव नीलेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने आदी उपस्थित होते.
हेही वाचा - मोदी तर दिलदार नेते, महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपये देतील - संजय राऊत
'सरकारकडून केवळ पोकळ घोषणा'
फडणवीस म्हणाले, की मागील निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर केवळ पोकळ घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. निसर्ग चक्रीवादळात केवळ 150 कोटी रुपये जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली. त्यावेळी मोठे नुकसान होऊन फार तोकडी मदत त्यावेळी सरकारने केली. शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले आहे, मात्र ज्यावेळी द्यायची वेळ येते त्यावेळी मात्र यांच्याकडून हात आखडता घेतला जातो. सरकारने निदान आतातरी योग्यप्रकारे मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - तौक्ते चक्री वादळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचे पाहणी दौरे, मात्र मदत कधी?
'जिल्ह्यातील कोविड डेथ रेटकडे लक्ष देण्याची गरज'
जिल्ह्याचा कोविड डेथ रेट हा जास्त आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, मात्र याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, कोविडच्या या काळात जी काही मदत प्रशासनाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.