रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना तपासणीची सुविधा मंगळवारपासून उपलब्ध होत आहे. 1 कोटी 07 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्या 09 जुनला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
कोविड- 19 ची संख्या सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी खास बाब म्हणून या प्रयोगशाळा उभारणीस मंजूरी प्रदान केली होती. सध्या रुग्णांचे तपासणी नमुने कोल्हापूर आणि मिरज येथे पाठविण्यात येतात. त्या ठिकाणी इतरही जिल्ह्यातून नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे या जिल्ह्यातील तपासणी नमुन्याचे अहवाल विलंबाने प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर या प्रयोगशाळा उभारणीची मागणी पुढे आली होती. मंजूरी प्राप्त होताच युध्दपातळीवर प्रयोगशाळा उभारणीचे काम हाती घेऊन अवघ्या 10 दिवसात ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
या उद्घाटन समारंभास मुंबई येथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव प्रदीप व्यास हे तर रत्नागिरीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत हे उपस्थित राहणार आहेत.
या लॅबला मंजुरी देत तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. एका तासात ९६ अहवाल कसे येतील यासाठी आणखी एक अतिरिक्त मशीन मागविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खा. राऊत रत्नागिरीत बोलताना म्हणाले.