रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची अपरिमित हानी झाली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात बागायती या वादळात उद्धवस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे रायगड आणि रत्नागिरीतील एकूण 2720 हेक्टर वरील नारळ झाडे यामध्ये उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे केंद्रीय नारळ बोर्डाने वादळात झालेल्या नारळाच्या झाडांच्या पाहणीसाठी एक विशेष समिती नेमली होती.
रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. निलेश शिंदे यांचाही या समितीमध्ये समावेश होता. दोन दिवस या समितीने दोन्ही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या समितीच्या पाहणीत दोन्ही जिल्ह्यातील 2720 हेक्टर क्षेत्रातील 4 लाख 77 हजार नारळ झाडांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा... राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती; तर मेहता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार
रायगड जिल्ह्यात 3200 हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड आहे. त्यातील 2500 हेक्टर क्षेत्रातील नारळ झाडांचे नुकसान झाले आहे. रायगडमध्ये सर्वाधिक नारळ झाडांचे नुकसान श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगर आणि तळा या भागांमध्ये झालं आहे. रायगडमध्ये झाडे मोडणे, अर्धवट तुटणे, आशा प्रकारचे मोठे नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 5656 हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड आहे. मात्र, 220 हेक्टर क्षेत्रातील नारळ झाडे निसर्ग चक्रीवादळात उद्धवस्त झाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यातच हे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यात नारळ झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत जवळपास 4 लाख 77 हजार झाडांचे नुकसान झाले असल्याची माहिती या समितीतील सदस्य डॉ. वैभव शिंदे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली. सध्या या समितीच्या पाहणीनंतर या संदर्भातील अहवाल तयार होत आहे. दरम्यान या केंद्रीय नारळ बोर्डाच्या समितीचे सदस्य आणि रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.
हेही वाचा... पतंजलीच्या 'कोरोनिल'ला महाराष्ट्रात बंदी - गृहमंत्री