रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. रत्नागिरी, लांजा, तसेच राजापूर येथील नाटे, जैतापूर, तुलसुंदे, आणि अंबोलगड येथे विविध ठिकाणांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही केली.
'ठाकरे सरकार कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार'
ठाकरे सरकार आल्यापासून राज्याला पनौती लागली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे घरांची छपरे उडून गेली आहेत तर गाईंचे गोठे, बागा तसेच विद्युत पोलदेखील पडले आहेत. अश्या परिस्थितीत रत्नागिरीचे पालकमंत्री, खासदार, आमदारांनी सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका राणेंनी केली. कोरोनामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. १ जून नंतर परिस्थिती सामान्य होईल असे वाटत असताना तौक्ते चक्री वादळामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मागच्या निसर्ग चक्रीवादळासारखे ह्या वादळात सुद्धा ठाकरे सरकार कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार असे दिसत आहे, असेही राणे म्हणाले आहेत.
हेही वाचा - सत्ताधाऱ्यांना मराठा आंदोलन पेलवणार नाही, त्यामुळे लॉकडाऊनची खेळी - चंद्रकांत पाटील