रत्नागिरी - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयच हे दडपण आणू शकते, असा थेट आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. तसेच जर हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांना चौकशीसाठी बोलवा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली आहे.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, यामध्ये पारदर्शकता यावी, अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी होती. मात्र, मुंबई पोलीस कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयच हे सर्व दडपण आणू शकते, कुठल्या एका मंत्र्याला असे करणे शक्य नाही. म्हणून मी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले होते. कारण आदित्य ठाकरे कलाकारांच्या सर्व पार्ट्यांमध्ये असतात. या केसमध्ये आतापर्यंत 56 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. यातील 10 ते 12 लोक असे आहेत, त्यांच्या घरी आदित्य ठाकरेंची उठबस असते. म्हणून या केसच्या चौकशीच्या भागामध्ये जे-जे आहेत त्यांचे गाडी नंबर, सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल्स हे सर्व तपासण्यात यावेत, अशी मागणी राणे यांनी केली.
सध्या ही केस बिहार पोलिसांनी सीबीआयकडे हस्तांतरित केली आहे. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप हस्तांतरित केलेली नाही. या प्रकरणातील खरे आरोपी बाहेर यावेत आणि तुरुंगात जावेत. पोलिसांनी धाडस असेल तर आदित्य ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवावे, असे राणे म्हणाले.