रत्नागिरी - राज्यात महाविकास आघाडीचे सुत जळले आहे. मात्र, जिल्हास्तरावर हे नाते अजूनही तितके परिपक्व झालेले नाही. याचेच उदाहरण म्हणजे विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. पक्ष विरोधी काम केले म्हणून या चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी आणि सोहेल साखरकर अशी या चार नगरसेवकांची नावे आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान तर काही नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. काही नगरसेवक उघडउघड सेनेबरोबर फिरत होते. याचा सविस्तर अहवाल तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला होता. आता थेट नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा या चौघांनी पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या 4 नगरसेवकांना पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा - विधान परिषद : महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
दरम्यान, आपण कुठल्याही प्रकारे पक्षाविरोधात काम केलेले नाही. आपण राष्ट्रवादीतच असल्याचे नगरसेवक मुसा काझी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या नगरसेवकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय कारवाई करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - विधान परिषद : महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल