रत्नागिरी - 'नाणार आता होणार' अशी घोषणा केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी राजापूरात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गाजत असलेला रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील १४ गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पावरून गेल्या दोन वर्षापासून प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये मतमतांतरे आहेत. त्याचे पडसाद राजकीय पक्षांमध्ये उमटताना दिसत आहेत. अशात राणेंची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील एस.टी. डेपोसमोरील भाजपाच्या तालुका कार्यालयाच्या प्रांगणात राणे यांनी राजापूरवासीयांशी संवाद साधताना रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भाष्य केले. नाणारला काही लोकांचा विरोध असला तरी, नाणार रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे 'नाणार आता होणार' असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. नाणारला विरोध न करता नाणारच्या बाजूने राहण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
हेही वाचा -Video : उगाच पलटन वाढू नका, दोनच अपत्यांवर थांबा - अजित पवार