रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली होती. ती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र १६ तासानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
परशुराम घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून दरड हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू होते. त्यासाठी ४ जेसीबी आणि २ फोकलेन यंत्रांचा वापर करुन रात्रभर दरड हटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे दरड हटविण्यात अडथळे येत होते. अखेर, सकाळी ७ वाजता, म्हणजे तब्बल १६ तासानंतर प्रशासनाला महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले. त्यामुळे सध्या महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.