रत्नागिरी - केळ्ये आणि पड्यारवाडीतील पाणी टंचाईची दखल घेत म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी हा प्रश्न सोडवला आहे. रत्नागिरीत येताच पड्यारवाडी येथे जावून त्यांनी स्वतः आटलेली विहीर पाहिली आणि गावकऱ्यांसोबत संवाद साधला.
गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे केळ्ये, पड्यारवाडी गावावर भीषण परिस्थिती ओढवली आहे. गावातील विहिरीचे पाणी संपल्याने खासगी स्त्रोताचा वापर करुन सामंत यांनी वाडीला पाणी उपलब्ध करुन दिले आहे. गावातील केशव पड्याल गुरूजी, भिकू लोगडे, चंद्रकांत पड्यार, यासिन धर्मे यांनी खासगी पाण्याचे स्त्रोत उघडे करुन स्थानिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. तसेच याठिकाणी सुमारे ३ हजार लिटरची पाण्याची टाकी बसवली आहे. गरज भासल्यास आणखी एखादी टाकी बसवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या गावात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. यासाठी माझा प्रयत्न राहिल. ग्रामस्थांनी एकत्रित येवून जागा उपलब्ध करुन दिल्यास पाण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची माझी तयारी आहे, असे हे ते म्हणाले. यावेळी सामंतांनी पाणीप्रश्न सोडवल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
कोकणात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. धो-धो पाऊस कोसळून योग्य नियोजनाच्या अभावामुळे आज केळ्ये गावाप्रमाणे अनेक गावे तहानलेली राहिली आहेत. माध्यमांत आलेल्या बातमीची दखल घेत लोकप्रतिनिधी म्हणून आमदार उदय सामंत यांनी पुढाकार घेत गावातला पाणीप्रश्न एका बैठकीत सोडविला. जर हाच आदर्श इतर लोकप्रतिनिधींनी घेतला तर कुठल्याच गावात पाणी टंचाई राहणार नाही, असे येथील गावकऱ्यांनी म्हटले आहे.