रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता याला राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणी आता हे धरण बांधलेल्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात बोट उगारलं जात आहे. मात्र, तिवरे धरण फुटीत आपला काहीच दोष नसल्याचा दावा शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे.
२० वर्षापूर्वी आमदार चव्हाण आणि त्यांच्या बंधूच्या खेमराज कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे धरण बांधले होते. हे धरण मातीचे बांधण्यात आले होते. त्यामुळे तब्बल २० वर्षानंतर धरण बांधलेल्यांना या दुर्घटनेबाबत कसं काय दोषी धरलं जावू शकते, असा उलट सवाल करत चव्हाण यांनी त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
तर आपण लोकप्रतिनिधी असल्याने यात आपल्याला गुंतवले जात असल्याचा आरोपही सदानंद चव्हाण यांनी केला आहे. तसेच पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी या धरणाच्या डागडुजीसंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवी होती. त्यामुळे आताच्या दुर्घटनेला पाटबंधारे विभागच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही आमदार चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे चव्हाण हे या प्रकरणात खेमराज कन्स्ट्रक्शन निर्दोश असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील भेंदवाडी गाव पाण्याखाली गेले. यामध्ये २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ११ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.