रत्नागिरी - पावसाळा सुरू होताच समुद्रात मोठे उधाण आले. या उधाणामुळे लाटांचे रौद्र रुप कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळत आहे. मंगळवारी अमावास्या असल्याने समुद्राचे आणखीच मोठे रौद्र रूप पाहायला मिळणार आहे.
आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. मात्र समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधला गेला आहे. मात्र, या आजस्त्र लाटांमुळे या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड वाढले तर समुद्राच्या लाटा मानवी वस्तीत घुसू शकतात.
दरवर्षी हा बंधारा अजस्त्र लाटांमुळे फुटतो. यावर्षी साडेचार मीटर उंचीच्या अजस्त्र लाटांनी मिऱ्या इथल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. मोठ्या लाटा असल्याने मिऱ्या आलावा आणि पंधरामाड परिसरातले नागरिक भयभीत झालेत. तर नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान किनाऱ्यावरच्या उधाणाचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.