रत्नागिरी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांकडून आलेल्या नोटीसबद्दल ( Mumbai Police Notice To Devendra Fadnavis ) शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया आली आहे. याबाबत शिवसेना उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'आज मी माझ्या मतदार संघातील काही कामांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे फडणवीस यांना आलेल्या नोटीसबदल मला माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन', अशी प्रतिक्रिया देत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी फडणवीस यांना आलेल्या नोटीसीबद्दल अधिक बोलणे टाळले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थिर
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होणार नाहीत याचं अतिशय चांगलं उत्तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी मॅडम एकत्र असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नसून ते पाच वर्षे पूर्ण करेल. मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडेच राहील आणि शिवसेनेचाच महापौर राहिल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.