रत्नागिरी- कणकवलीच्या दादागिरीचे दिवस आता संपले आहेत. आम्ही सुसंस्कारित आहोत. परंतु अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला. ते गोळप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलत होते.
शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी जुना व नवा वाद काढून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेले अनेक वर्ष यांची गोळप ग्रामपंचायतीवर मक्तेदारी होती. आता कणकवलीचे समर्थन घेऊन दादागिरी करायची असेल, तर ती खपवून घेणार जाणार नाही, असा त्यांनी इशारा दिला.
शिवसेनेच्या अधिकृत पॅनेलविरोधात पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी यांनी स्वत:चे पॅनल उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली.
ग्रामपंचायतीमध्ये एवढे काय असते, त्यांनाच माहित-
उदय सामंत म्हणाले की, माजी सभापती मंगेश साळवी यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी गोळप गावात लढाई सुरू आहे. ग्रामपंचायतीमध्ये एवढे काय असते, त्यांनाच माहित आहे. पण, आम्ही संस्कारक्षम आहोत. निवडणुका सुसंस्कृतपणे लढतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. गोळप गाव गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या सोबतच गाव राहील, याची मला खात्री आहे. परंतु ज्यांना शिवसेनेने खूप काही दिले, तेच कणकवलीचे समर्थन घेऊन या निवडणुकीत दादागिरी करणार असतील, तर ते सहन केले जाणार नाही. जशास तसे उत्तर देण्याची ताकद येथील माझ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये आहे. आता दादागिरीला घाबरायची आवश्यकता नाही.
मागेल तेवढा गावाला निधी-
गोळप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १५ ही सदस्य विजयी होऊन शिवसेनेचा भगवा या ग्रामपंचायतीवर फडकेल याची मला खात्री आहे. निवडणूक निकालानंतर गावाच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल. गाव जेवढा निधी मागेल तेवढा निधी मंत्री म्हणून मी देईन, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.
या सभेला उद्योजक अण्णा सामंत, नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख प्रदिप उर्फ बंड्या साळवी, ज्येष्ठ जि.प. सदस्य उदय बने, नंदकुमार मुरकर, विठ्ठल पावसकर, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, बावा चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात आमदार-खासदारांसह मंत्रीही उतरले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.