रत्नागिरी - कोकणात सध्या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी येण्यावरून मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, याबाबत कोकणातील तसेच मुंबईत असणाऱ्या कोकणातील राजकीय नेत्यांची चर्चा झाली आहे. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच याबाबत केंद्र आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सही महत्त्वाच्या ठरणार असल्याचे ते म्हणाले. सामंत येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीची मुदत आता संपत आली आहे. त्यानंतर आता गावातील एका व्यक्तिला प्रशासक नेमले जाणार आहे. याचे अधिकार पालकमंत्री आणि सीईओ यांना देण्यात आले आहेत. त्यावर विरोधकांनी टीका केली आहे. याबाबत विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीही काम नाही. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. त्यांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'भाजपचे लोक संपर्कात, कोण आहे ते समजल्यास राजकीय भूकंप होईल'
दरम्यान, कोरोना झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत सामंत म्हणाले की, अशी वेळ त्यांच्यावर येऊच नये. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो.