रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराचा मोठा फटका रत्नागिरीला बसला आहे. सध्या जिल्ह्यात दूध टंचाई निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने दुधाचे टँकर जिल्ह्यात पोहचू शकलेले नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रातून दररोज हजारो लिटर दूध कोकणात येत असते. मात्र, आज सकाळी 'वारणा' ची फक्त एक गाडी 3 हजार लिटर दूध घेऊन रत्नागिरी शहरामध्ये आली. या गाडीलादेखील रत्नागिरीमध्ये येण्यासाठी तब्बल 12 तासांचा कालावधी लागला. आज सकाळी 9 च्या सुमारास ही गाडी रत्नागिरी शहरात आली. दूध आले आहे हे समजताच दूध घेण्यासाठी ग्राहकांनी वितरकांच्या इथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हे दूध दोन तासांच्या आतच संपले.