रत्नागिरी - जिल्ह्यात मध्यप्रदेश राज्यातील शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे अडकले होते. हे मजूर आपल्या गावी जाता यावे, यासाठी वारंवार मागणी करत होते. अखेर या मजुरांसाठी पनवेल येथून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मजूरांना रत्नागिरी जिल्ह्यातून पनवेलपर्यंत जाण्यासाठी एसटी बसची सोय करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळी 7 वाजल्यापासून 30 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण येथील डेपोतून बसेस सोडण्यात आल्या. एका बसमध्ये 22 मजूर याप्रमाणे 30 गाड्या जिल्ह्यातून सोडण्यात आल्या असल्याची माहितीही विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत या बसमधून मजुरांना सोडून येणार आहेत.
हेही वाचा... "स्थलांतरीत कामगारांना घरी पोहचवण्यासाठी दररोज १०० रेल्वे चालवा"
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये परराज्यातील अनेक मजूर गावी जाण्याचा धावा करत आहेत. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात हजारो स्तलांतरीत मजूर अडकले आहेत. सध्या त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.