रत्नागिरी - अयोध्या राममंदिर व बाबरी मशीद जागेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे शांतता समिती बैठक आयोजित केली होती. अयोध्या राममंदिर निकालाबाबत कोणतेही गैरसमज जिल्ह्यात पसरवण्यात येऊ नयेत. तसेच याबाबत कोणताही तणाव निर्माण होऊ नये, याकरता जिल्हा प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'कोस्टल मॅरेथॉन'द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश
बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास वॉर रुम तयार करण्यात आली असून त्याद्वारे सोशल मीडियावर पाठवण्यात येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास माहिती तंत्रज्ञान नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
नागरिकांना कोणतीही चुकीची गोष्ट आढळून आल्यास केवळ बघ्याची भूमिका न घेता त्याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले. पोलिसांमार्फत त्याबाबत योग्य कारवाई जरूर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - गणपतीपुळ्यात तीन घटनांमध्ये समुद्रात बुडणाऱ्या 12 जणांना वाचवण्यात यश
बैठकीमध्ये उपस्थित विविध सामाजिक संस्थेच्या, राजकीय पक्षांच्या, विविध धर्माच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. सर्वांच्या मतांचा आदर करून सर्व यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.