रत्नागिरी - फळांचा राजा अर्थात हापूस आंबा. पण यावर्षी सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखण्यासाठी थोडी कळ सोसावी लागणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत पहिल्या टप्प्यातील आंबा तयार होतो. पण यावर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडल्यामुळे आंबा हंगाम लांबवणीर पडला आहे. फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आंब्याचे उत्पादन नाही. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदील झाले आहेत. मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये यंदा आंब्याच्या पेट्यांची आवकही घटली आहे.
हवामान बदलाचा आंब्याला फटका
हवामानातील बदलाचा फटका यावर्षीदेखील हापूसला बसला आहे. त्यातच निसर्ग वादळामुळे यावर्षी आंबा झाडांच्या मोहरावर परिणाम झाला आहे. ऑक्टोबरपर्यंत पावसाळा लांबल्यामुळे जमिनीतील ओलावा कायम राहिला. त्यामुळे ऑक्टोबर हिटमुळे मुळांवर ताण येऊन नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्यानंतर कलमे मोहराकडे वर्ग होतात. मात्र यावर्षी ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही . शिवाय थंडीही डिसेंबरमध्ये सुरू झाली. परंतु मध्येच थंडी गायब होत असल्याने कलमांना फारसा मोहर आला नाही. जानेवारीत येणारा मोहर एक महिना उशिरा सुरू झाला आहे. जून झालेल्या पालवीतून मोहोर येत असून, त्याचे प्रमाण मात्र अल्प आहे. या मोहराचा आंबा मे मध्येच बाजारात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील आंबा आता बाजारात येऊ लागला आहे. पण त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.
सुरुवातीला अतिशय कमी आंबा बाजारात
रत्नागिरीत शरद पाटील यांच्या मिरजोळे इथल्या आंबा बागेत सध्या आंब्याची तोड सुरू झाली आहे. पण फेब्रुवारी महिन्यात तोड होवून बाजारात जाणारा आंबा यंदा फारच कमी दिसत आहे. यावर्षी केवळ १५ ते २० टक्के आंब्याची फेब्रुवारीत तोड सुरू झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारीत पाटील यांच्या बागेतून ४० ते ४५ पेटी आंबा वाशी मार्केटला जातो. पण यावेळी हे प्रमाण १० पेट्यांवर आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आंबा उत्पादन कमी असल्याने झालेला खर्चही भरून निघणे मुश्कील असल्याचे पाटील यांनी सांगितले.