रत्नागिरी - मागील वर्षी पाऊस लांबल्याने यंदाच्या आंबा हंगामालाही उशिराने सुरुवात झाली आहे. दरवर्षी मार्चमध्ये आंबा हंगामाला सुरुवात होते आणि सुरुवातीच्या आंब्याला दरही चांगला मिळत असतो. पण यंदाच्या वर्षी लांबलेला पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादन 50 टक्क्यांनी घटले आहे. त्यात आता कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये आंबा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने, आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद आहेत. अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत आहेत. ज्याचे हातावर पोट आहे, ते ही घरीच राहणे पसंत करत आहेत. शहरी भागातील नागरिक भाजी किंवा इतर काही किराणा वस्तू घेण्यासाठी बाहेर पडतात, पण गावातील नागरिक मात्र काटेकोरपणे या संचारबंदीचे पालन करताना दिसत आहे. अशात आंबा काढणीला आला आहे. पण मजूरच घरी असल्याने त्याचा मोठा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा हंगामाला उशिरा सुरुवात झाली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा आंबा हंगाम जवळपास एक महिना लांबला आहे. तशात आंबा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने चित्र आहे.
दरवर्षी काही मोठ्या आंबा बागायतदारांकडे कामासाठी नेपाळहून लोकं येत असतात. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये हे नेपाळी गुरखे आंबा बागायतदारांकडे येतात, ते जूनपर्यंत त्यांच्याकडे असतात. आंबा बागायतदारांना जेवढे मनुष्यबळ लागते. त्यातील ३० ते ४० टक्के नेपाळी असतात. तर इतर स्थानिक लोकं असतात. मात्र सध्या संचारबंदीमुळे स्थानिक मजूर घरीच आहे. त्यामुळे जे नेपाळी कामगार आहेत. त्यांच्यावरच मोठया आंबा बागायतदारांना विसंबून राहावे लागत आहे. त्यातही काही मोजकेच नेपाळी झाडावरून आंबा काढण्यात तरबेज असतात. पण जे आंबा काढणीमध्ये स्थानिक पारंगत आहेत. अशा मजुरांना संचारबंदीमुळे घरीच थांबावं लागत आहे आणि जे नेपाळी मजूर आहेत. त्यांना एवढी आंबा काढणी शक्य नाही.
दुसरीकडे ज्यांची २५ ते ५० आंब्याची झाडं आहेत, ते तर पुर्णतः स्थानिक मजुरांवरच अवलंबून असतात. मात्र या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते तर पूर्णतः हताश झाले आहेत. काढणीला आलेला आंबा मजूराअभावी गळून जातो की काय अशी भिती आंबा उत्पादकांच्या मनात आहे. त्यातही आंबा काढून जरी बाहेर पाठवला तरी त्याला गिऱ्हाईक नाही, दरही नाही त्यामुळे आतापर्यंत जो खर्च झाला आहे. तेवढाही निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी, सरकारने काहीतरी योजना आखावी, अशी मागणी होत आहे.