रत्नागिरी -केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला, तरी महाराष्ट्रात अद्याप मान्सूनची प्रतिक्षा आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. वीजांचे तांडव सुरु असून वीज पडून काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे घरावर वीज पडून स्वयंपाक खोलीचं मोठं नुकसान झालं आहे. जेवणाची वेळ असतानाही घरातील सर्वजणं बाहेर गप्पात रंगल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
70 हजाराचे नुकसान
वीज पडल्यामुळे घरातील संपूर्ण वायरींग जळून गेले आणि फ्रिजचे नुकसान झाले. स्वयंपाक खोलीतील ओट्याचा काही भाग फुटला. छताच्या पत्र्यावर कोसळलेली वीज लादीवर आपटून किचनचा ओटा फोडून जवळच असलेल्या बाथरुमचा सिमेंटचा दरवाजा उभा पिंजत खिडकीवाटे बाहेर गेला असावी असा अंदाज दिपक यांनी व्यक्त केला आहे. विजेच्या तांडवाने अस्ताव्यस्त स्वयंमपाक पाहिल्यावर दुर्गवळे कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ओट्याच्या बाजूला असलेल्या गॅस सिलींडरपर्यंत विजेचा लोळ पोचला नव्हता. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे 70 हजाराचे नुकसान नोंदले गेले आहे.