रत्नागिरी - राज्यात काही ठिकाणी वाईन शॉप सुरू झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र मद्यप्रेमींना अजून काही दिवस मद्य दुकाने उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण, वाईन शॉप उघडण्याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे देशभर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, सोमवारपासून काही ठिकाणी शिथीलता देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने जिल्ह्यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. काही अटींवर राज्यात वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातही वाईन शॉप सुरू होतील या शक्यतेने मद्यप्रेमींचा चेहरा खुलला होता. पण त्यांचा हिरमोड झाला. केंद्र शासनाने ऑरेंज झोनमधील मद्य दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली, तरी याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
दुकानात मद्य खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना सुरक्षित अंतर व अन्य अटी घालण्यात आल्या आहेत. मद्य खरेदीसाठी गर्दी झाल्यास मद्य दुकाने बंद करण्याचा अधिकारही प्रशासनाला देण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील मद्य दुकाने उघडण्यास परवानगी देण्यास निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी मद्यप्रेमींना कळ सोसावी लागणार आहे.