रत्नागिरी - नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली जीवघेणा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे नांगरणी स्पर्धेदरम्यान स्पर्धकाचा बैलांवरील ताबा सुटला. बैल उधळून स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या लोकांच्या अंगावर गेले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत उपस्थितांपैकी ७ ते ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील भाजप पक्ष कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. बैलगाडा स्पर्धा बंद झाल्याने कोकणात नांगरणी भरवल्या जातात. अनेक स्पर्धक बैलजोड्या घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी आले होते. हा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकही हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला काही जोड्या नांगरणी करण्यासाठी यशस्वीरित्या धावल्या. मात्र, नंतर एका स्पर्धकाचे बैलांवरील नियंत्रण सुटल्याने स्पर्धेत जीवघेणा प्रकार सुरू झाला.
अशा स्पर्धांमुळे जनावरांचे हाल तर होतातच शिवाय, नांगर धरून धावणार्या स्पर्धकाच्या जिवाला देखील धोका निर्माण होतो. नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या जीवघेण्या प्रकाराकडे पोलिसांसह जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.