रत्नागिरी - शिरगाव हद्दीतील कुष्ठरुग्ण वसाहतीतील रुग्णांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दरमहा सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कुष्ठ पीडित संघटनेने केली. याबाबत शुक्रवारी त्यांनी सभापती प्रकाश रसाळ यांच्याकडे लेखी निवेदन दिले. यावेळी सभापती रसाळ यांनी सानुग्रह अनुदान देण्याला तत्वत: मान्यता दिली आहे.
राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत कुष्ठ रुग्णांना दरमहा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगर पालिकांनी त्यांची अंमलबजावणी केली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषेदेने याची अंमलबजावणी न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य कुष्ठ पीडित संघटनेचे राज्य अध्यक्ष भूपाल पिरगणे, सल्लागार रसुल मुल्ला, सदस्य हर्षल जाधव, निमंत्रक तथा असो. ऑफ अफेक्टेड बाय लेप्रसी इंडियाच्या सदस्या सौ.माया नन्नावरे, निमंत्रक प्रकाश नन्नावरे, स्थानिक समितीचे प्रमुख यशवंत सावंत यांनी सभापती प्रकाश रसाळ यांना निवेदन देऊन वस्तुस्थितीची माहिती दिली.
हेही वाचा - सर्वंकष विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घडविली जगाची सफर
सभापती श्री. रसाळ यांनी समाजकल्याण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून शासन निर्णयाप्रमाणे कुष्ठ रुग्णांना आवश्यक अनुदान देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक कागदपत्राचा प्रस्ताव तयार करून सानुग्रह अनुदानासाठी जिल्हा परिषेदेच्या अंदाजपत्रकात कायमस्वरुपी तरतूद करण्याचे आवश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले. संघटनेने दरमहा १ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पीडित असलेल्या सुमारे १२ ते १५ रुग्णांना अनुदान देण्याला रसाळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा - रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर