रत्नागिरी - शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याची मोठ्या शिताफिने वनविभागाने सुटका केली आहे. तब्बल १२ तासानंतर या बिबट्याची सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातल्या लावगणवाडीत शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बुधवारी रात्री बिबट्या अडकला. त्यानंतर सकाळी गावातील मंडळीनी गावातील नदीजवळच्या भागात बिबट्याचा आवाज ऐकला. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने तात्काळ याठिकाणी धाव घेतली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याचे दोर कापले. मात्र, हा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकवणे कठिण काम होते. वनविभागाचे कर्मचारी बिबट्याच्या समोर जावून आपला जीव धोक्यात घालून या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यश येत नव्हते. एकदा तर हा बिबट्या पिंजऱ्यात जावून परत माघारी आला. मात्र, अखेर या बिबट्याला पकड्यात वनविभागाला यश आले.
जेरेबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर वनविभागाच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत.