रत्नागिरी - लांजा तालुक्यातील खोरनिनको येथे दरड कोसळून दोन घरे गाडली गेल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे अनुसया रामचंद्र कदम (75) शेजारच्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या.
दरड घरावर कोसळल्याने विश्वनाथ रामचंद्र कदम यांचे घर पूर्ण गाडले गेले आहे. तर जयवंत नारायण माजलकर यांच्याही घराचे मोठे नुकसान झाले आहे. विश्वनाथ यांचे साडे सहा लाख रुपयांचे तर जयवंत माजलकर यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले.
मुचकुंदी धरणात विस्थापित झालेल्या 23 कुटुंबाचे पुनर्वसन याठिकाणी करण्यात आले आहे. मात्र हे पुनर्वसन डोंगराखाली करण्यात आले आहे. या ठिकाणी यापूर्वी भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका घटनेत यापूर्वी येथील एक पूर्ण घर जमीनदोस्त झाले होते. त्यानंतर आज ही घटना घडली आहे.