रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेतील अपघातग्रस्तांसाठी प्रशासनाने ज्या जागेवर 15 शेड उभारण्याचा निर्णय घेतला होता नेमकी तीच जागा खचली आहे. धरणाला लागून डोंगरावर असलेल्या या जागेला भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली असून हा डोंगरच खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 15 शेड उभारण्याची जागा ही धरणाला लागून डोंगरावर आहे. डोंगरावरील काही गुंठे सरकारी क्षेत्र हे मोकळे आणि सपाट असून ही जागा प्रशासनाने 15 शेड उभारण्यासाठी निश्चित केली होती. मात्र ही जागा म्हणजे हा डोंगर खचू लागला असून मोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. या ठिकाणी अजून कोणतेही काम सुरू झालेले नसले तरी हा भाग भेगांमुळे केव्हाही कोसळू शकतो किंवा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याची भीती आहे. असे झाल्यास डोंगराखाली जी काही थोडीबहुत भातशेती आहे ती देखील दरडीखाली जाण्याची शक्यता आहे.
या घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, महसूलचे प्रकाश सावंत, पोलिस अधिकारी यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. आता या जागेचा प्रस्ताव रद्द केला जाणार असून शेड उभारण्यासाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे. तसेच याप्रकरणी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. डोंगर खचू लागल्यामुळे आणि डोंगराला भेगा पडल्यामुळे धरण परिसरात फिरण्यास सर्वांना बंदी घातली जाणार आहे