रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता या महिलेचा मृत्यू झाला असून हा जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे.
दापोली तालुक्यातील माटवण येथील ही महिला मुंबई येथे मुलाकडे राहत होती. या महिलेला सायन येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना केईएम किंवा जेजे येथे हलवण्यात यावं, असं सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं.
त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णवाहिकेने दापोलीत आणलं. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह अल्याने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती सुरुवातीपासून चिंताजनक होती. दरम्यान, रविवारी त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
यापूर्वी खेडच्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण कोरोनाचे 2 बळी झाले आहेत. सतत वाढत चाललेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे धास्तावलेल्या रत्नागिरीकरांच्या चिंतेत या घटनेमुळे आणखी भर पडली आहे.