रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 791 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एकूण 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
बुधवारी 791 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. बुधवारी आलेल्या आकडेवारीने बाधित रुग्णांचा उच्चांक गाठला आहे. प्राप्त अहवालानुसार 791 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 601 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 190 रुग्ण अँटिजेन चाचणी केलेले आहेत.
जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 21 हजार 069 जाऊन पोहोचली आहे. दरम्यान आजच्या 791 मधील सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यात तब्बल 237 रुग्ण सापडले आहेत, तर चिपळूण 189, खेड 109, दापोली 38, गुहागर 80, संगमेश्वर 43, मंडणगड 2, लांजा 54, राजापूरमध्ये 39 रुग्णांची नोंद झाली आहे.
13 जणांचा मृत्यू
दरम्यान गेल्या 24 तासांत 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर यापूर्वीचे 2 असे एकूण 13 जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 619 वर जाऊन पोहोचली आहे.