रत्नागिरी - दरवर्षीप्रमाणेच यंदाही कोकण बोर्डाने (10)वीच्या निकालामध्ये बाजी मारली आहे. सर्व विद्यार्थी पास झाल्याने, कोकणचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोरोनामुळे यंदा (10)वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर लावण्यात आला आहे. कोकण बोर्डातील (31 हजार 168) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मूल्यांकन गुण पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
100 टक्के लागला निकाल
कोकण विभागातून एकूण (31 हजार 168) विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये रत्नागिरीतील 10 हजार 754 मुले आणि 10 हजार 323 मुली असे एकूण 21 हजार 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 284 मुले, तर 4 हजार 804 मुली असे एकूण 10 हजार 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालात (1.23) टक्के वाढ
गेल्यावर्षी मार्च (2020) मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल (98.77) टक्के इतका लागला होता. यावर्षी निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षीच्या निकालात 1.23 टक्के इतकी वाढ झाली आहे. यंदाचा निकाल माध्यमिक शाळा स्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आला आहे. तसेच, अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन इ. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. त्यामुळे गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध असणार नाहीत. श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.