रत्नागिरी- दहावीच्या परीक्षेत कोकण बोर्डाने सलग ८ वर्षे राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे. मागील ७ वर्षे ९२ टक्क्यांहून अधिक निकाल देणाऱ्या कोकण बोर्डाचा टक्का यावेळी मात्र घसरला आहे. यावेळचा निकाल ८८.३८ टक्के लागला आहे. कोकण बोर्डांतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी सर्वाधिक ९१.२४ टक्के असून, रत्नागिरीचा निकाल ८७ टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी (ता. ८) जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक ८८.३८ टक्के एवढा निकाल लागला आहे. कोकण बोर्डाने संपूर्ण राज्यात अव्वल येण्याचा मान सलग आठव्या वर्षीही मिळवला आहे. बारावीच्या निकालामध्ये देखील कोकण बोर्डाने यावर्षी बाजी मारली होती. बारावीच्या निकालामध्ये कोकण बोर्ड सलग आठव्यांदा अव्वल क्रमांकावर राहिला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी ५.९९ टक्के एवढे अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ७.६२ टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किती होते परीक्षार्थी-
कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव भावना राजनोर यांनी कोकण बोर्डाचा १० वीचा ऑनलाईन निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. या निकालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून १० वी साठी ३४ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण ८८.३८ टक्के एवढे आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २३ हजार ३१५ विद्यार्थ्यांपैकी २० हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८७ टक्के निकाल लागला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार २८७ विद्यार्थ्यांपैकी १० हजार २९८ म्हणजेच ९१.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.९१ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.२४ टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.६६, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे टक्केवारी ९४ टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.४६, तर मुलांची ८५.४७ टक्के एवढी आहे. मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ५.९९ टक्के अधिक आहे