रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील कशेडी येथे घसरलेले मालगाडीचे डब्बे तब्बल तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर दूर करण्यात आले आहेत. यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
तुर्भे येथून गोवा येथे खत घेऊन चाललेल्या मालगाडीचे नऊ डब्बे सोमवारी खवटी नजीकच्या वावे पुलाजवळ रुळावरून घसरले होते. यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. या मार्गावरून धावणाऱ्या सर्व पार्सल गाड्या, ठिकठिकाणी अडकून पडल्या होत्या. अपघातात रेल्वे रुळ आणि स्लिपर्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कोकण रेल्वेचे ७५० कर्मचारी आणि अधिकारी गेले तीन दिवस रात्र-दिवस काम करत होते.
अखेर तीन दिवसांनतर रुळ आणि स्लिपर्स बदलण्याचे काम पुर्ण झाले आणि दिवाण खवटी येथे गेले तीन दिवस उभी असलेली पार्सल व्हॅन गोव्याकडे रवाना झाली. त्यानंतर लगेचच खेड स्थानकात थांबवून ठेवलेली गोव्याहून गुजरात येथे जाणारी पार्सल व्हॅन गुजरातकडे मार्गस्थ झाली.