रत्नागिरी Kiran Samant On Mashal : काही लोक खरे बोलण्याचा आव आणतात. मी कधीही खोटं बोलत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये म्हणून मी डीपी बदलला असं उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी म्हटलं आहे. काल गुरुवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी आपल्या डीपीवर एक स्टेटस ठेवलं होतं. त्यावरून संपूर्ण राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आज शुक्रवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी त्यांची भूमीका स्पष्ट केलीय.
म्हणून स्टेटस मागे घेतलं : किरण सामंत यावेळी म्हणाले की, होय मी मशालीचं स्टेटस ठेवलं होतं. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय वाटचालीत अडथळा येऊ नये म्हणून स्टेटस मागे घेतलं, असंही किरण सामंत यांनी स्पष्ट केलं. मी लवकरच स्पष्ट बोलणार आहे. जे बेलगाम बोलतायत त्यांच्यासाठी हे स्टेटस होतं, असाही टोला किरण सामंत यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाहून मी स्टेटस मागं घेतलं आहे. योग्यवेळी या स्टेटसचं उत्तर देईन, असं किरण सामंत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण यापूर्वी ओळखतही नव्हतो. मात्र गेल्या वर्षभरात त्यांच्याजवळ गेल्यानंतर कळलं की त्यांच्या इतका भावनिक माणूस कोणीही नाही, असं किरण सामंत यांनी म्हटलंय.
भाजपा, शिवसेना युतीचाच उमेदवार विजयी होणार : स्वतःचे ठेवावे झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी काही लोकांना सवय आहे. मी मात्र तसं करत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मी कधीही खोटं वागत नाही, खोटं बोलत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचाच उमेदवार निवडून येणार, हे निश्चित आहे. मी ते स्टेटस बदललं त्याचं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये.
हेही वाचा -