रत्नागिरी : राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज रत्नागिरीतले पत्रकार रस्त्यावर उतरले. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्रकारांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. काळ्याफिती लावून पत्रकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला. पत्रकारांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची सुद्धा मागणी पत्रकारांनी केली आहे.
कलम 302 लावण्यात आले : सोमवारी थार गाडी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवी कलम 302 लावण्यात आले आहे. फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबावरून हे कलम वाढविण्यात आले असून तसा अहवाल माननीय कोर्टला सादर केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
गुन्हेगाराला पाठिशी घातले जाणार नाही : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच झालेल्या घटनेचा मी देखील तीव्र निषेध करतो, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्ग कारवाई : मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, पालकमंत्री म्हणून मी स्वतः या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे. ज्याच्या गाडीने हा प्रकार घडला होता, त्याच्यावर सुरुवातीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. खोलात तपास झाल्यानंतर असे लक्षात आले की हे जाणीवपूर्वक झालेले आहे, त्यामुळे नंतर 302 चे कलम देखील लावण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्ग देखील कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. डीवायएसपी किंवा होम डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जाईल. घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.
अपघात की घातापात? : पत्रकार शशिकांत वारिशे यांची राजापूर पेट्रोल पंपावर 'थार' गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघाती मृत्यू नसून घातपात आहे, असा आरोप पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांनी केली होती.
हेही वाचा : Kasba By Poll Election: मला मुस्लिम मतांची गरज नाही, हिंदूंच्या मतांवर विजयी होणार- आनंद दवे