रत्नागिरी - एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना त्या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी करणे किंवा त्याचं निलंबन करा अशी मागणी करणं हे लोकशाहीला धरून असू शकत नाही, हे चुकीचं असल्याचं सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे. तसेच वझे यांची पोस्ट चिंताजनक असल्याचेही सामंत यांनी सांगितले. ते आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, सचिन वझे यांना कुणीच पाठिशी घालत नाही. त्यांची बदली देखील झालेली आहे, मात्र तपास चालू असताना विरोधकांकडून निलंबनासाठी तगादा लावणे चुकीचं असल्याचं सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
हेही वाचा - पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार?
वझे यांची पोस्ट चिंताजनक - सामंत
दरम्यान, सचिन वझे यांनी आज स्टेटसला जी पोस्ट ठेवली आहे, ती चिंताजनक आहे. या प्रकरणात देखील गृहमंत्री स्वतः लक्ष घालतील. पोस्ट काय आलेली आहे आणि विरोधकांची मागणी आहे यावर बोलण्यापेक्षा तपास व्यवस्थितरित्या झाला पाहिजे. तपास व्यवस्थित होऊन जे कोणी गुन्हेगार आहेत ते सापडले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे सामंत यावेळी म्हणाले.
हिरेन आणि डेलकर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने -
तसेच जसा या आत्महत्येचा तपास चालू आहे, तसाच एका खासदाराने देखील मुंबईत आत्महत्या केलेली होती, त्याचा देखील तपास चालू आहे. त्यामध्ये देखील सुसाईड नोट मिळालेली आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी योग्य पद्धतीने तपास व्हावा हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. तसा योग्य तपास होत असल्याचं सामंत यावेळी म्हणाले.
हेही वाचा - धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री