रत्नागिरी - नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद जोशी यांनी अपक्ष भरलेला अर्ज सोमवारी मागे घेतला. भाजपचे अधिकृत उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन यांच्याविरोधात जोशी यांनी अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आले होते. नाक्यानाक्यावर हा चर्चेचा विषय ठरला. दोघेही भाजपचेच मग अर्ज कसा भरला अशी चर्चा सुरू होती. परंतु सोमवारी ठरल्याप्रमाणे मुकुंद जोशी यांनी अर्ज मागे घेऊन अॅड. पटवर्धन यांच्यासमवेत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
सोमवारी दुपारी मुकुंद जोशी यांनी नगरपरिषदेत जाऊन अर्ज मागे घेतला. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पेडणेकर हे सुद्धा उपस्थित होते. दुपारी रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक आनंद मराठे, विजय पेडणेकर यांनी घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
एकेकाळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्ह्यात दांडगा संपर्क असणार्या मुकुंद जोशी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर त्यांना विविध स्तरांतून अनेक हितचिंतकांचे फोन आले. तुम्ही अर्ज का भरला, आता पटवर्धन साहेबांना निवडून येण्यासाठी पोषक वातावरण आहे, तुम्ही मुद्दाम अर्ज भरला आहे, माघार घ्या, शिवसेनेने ही निवडणूक शहरवासियांवर लादली आहे. आता सत्ताधार्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ योग्य आहे, असे अनेक फोन आल्याचे जोशी यांनी सांगितले.
ठरलेल्या व्यूहरचनेप्रमाणे मी अर्ज भरला व तो आज मागे घेतला आहे. अॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारात मी सक्रिय असून ते नक्कीच निवडून येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर अनेकांचे दूरध्वनी आले. भाजपची ताकद या निवडणुकीत दिसून येईल. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर महाराष्ट्रात एक नंबरचे शहर करण्याचा आमचा मानस असल्याचे मुकुंद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सुसंस्कृत, चारित्र्यवान, शिस्तबद्ध, प्रसंगी कठोर, उत्तम प्रशासक आणि जनतेच्या हक्कांची जाण असणारा व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पारदर्शक कारभार करणारा नेता म्हणून अॅड. पटवर्धन यांना सर्वस्तरातूंन पाठिंबा मिळत असल्याचे विजय पेडणेकर यांनी सांगितले.