रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 7 हजारांच्या पुढे गेला आहे. रविवारी आणखी 68 रुग्णांची भर पडली, त्यामुळे हा आकडा आता 7182 वर पोहचला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमधली आकडेवारी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव होता. त्यामुळे या सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार, हा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही ऑगस्टमध्येच कोरोनाचा विस्फोट झाला. त्यानंतर ही संख्या अधिकच वाढू लागली आहे. सध्या कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्खा 3932 एवढी होती. मात्र या महिन्यात 27 सप्टेंबर पर्यंत ही संख्या 7182 वर पोहचली आहे. त्यामुळे या महिन्यात रविवारपर्यंत (27 सप्टेंबर पर्यंत) कोरोनाचे तब्बल 3250 रुग्ण नव्याने सापडले आहेत. मार्चपासून ऑगस्टपर्यंत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि या महिन्यात वाढलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्याच्या दृष्टीने ही नक्कीच चिंतेची बाब आहे.
नागरिकांकडूनही नियमांचं उल्लंघन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या नियमांचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणासा सातत्याने आवाहन करीत आहेत. मात्र, नागरिक हे नियम टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच अनलॉक प्रक्रिया सुरू असल्याने लोकांच्या बेजबाबदार वागण्यात अधिकच भर पडली आहे. खरेदीसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मृत्यू दर 3.48 टक्क्यांवर, या महिन्यात 115 जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे 27 सप्टेंबर अखेर 250 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट अखेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 135 एवढी होती. मात्र या महिन्यात तब्बल 115 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा वेगही या महिन्यात वाढला आहे. ऑगस्ट अखेर मृत्यू दर 3.37 टक्के एवढा होता, तर सध्याचा मृत्यू दर हा 3.48 टक्के एवढा आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी आता 83.76 वर पोहोचली असली तरी मृत्यूची वाढती टक्केवारी जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. त्यातच या एका महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता जिल्ह्यासाठी नक्कीच ही चिंतेची बाब आहे.