रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा धक्का बसून खेड तालुक्यातील बोरज येथील दाम्पत्याचा दूर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास बोरजच्या जिल्हा परिषद शाळेजवळ घडली आहे.
३३ केव्ही वीज वाहिनीचा बसला धक्का
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दुचाकीने लोटे येथे गेले होते. लोटे येथील काम संपवून ते सायंकाळी परतत असताना त्यांची दुचाकी जिल्हा परिषद शाळा बोरज येथे पाहचली. दरम्यान वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेला ३३ केव्ही वीज वाहिनीचा जबरदस्त धक्का या दोघांना बसला आणि त्यांचा यात मृत्यू झाला.
परिसरात हळहळ
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने या घटनेची माहिती महावितरण कार्यालयात दिली व विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. या घटनेची माहिती मिळताच खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने दखल घेत पंचनामा करून मृतदेह कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ: मुंबईतील परिस्थितीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट