रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सध्या वाळू उत्खननास परवानगी मिळालेली नाही. मात्र तरीही जिल्ह्यातील काही ठिकाणच्या नदीपात्रांमध्ये परवानगी नसतानाही अनधिकृतपणे वाळू उत्खनन सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील गांग्रई खाडी भागातही अशाच प्रकारे अनधिकृतपणे बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. हातपाटीद्वारे हे वाळू उत्खनन सुरू आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बडवून अनधिकृतपणे सुरू असलेल्या या वाळू उत्खननाकडे स्थानिक महसूल प्रशासन मात्र सोयिस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.
हे ही वाचा - रायगड : खोपोलीतील महिंद्रा सान्यो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट
प्रशासनाची सोयिस्कररित्या डोळेझाक ?
शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून मोठया प्रमाणात अवैधरित्या सुरू असलेलं हे वाळू उत्खनन स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना मात्र दिसत नाही का? तालुका महसूल विभागही याकडे डोळेझाक करतंय का? बेकादेशीररित्या वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? की सोईस्कररित्या बेकायदेशीर वाळू उपश्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असे सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहेत. दरम्यान स्थानिक महसूल प्रशासनाला याची माहिती देऊनही ते कारवाई करत नसल्याचं काही स्थानिकांचे म्हणणं आहे. त्यामुळे आता जिल्हा महसूल प्रशासन तसेच खनिकर्म विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे.