रत्नागिरी - जिल्ह्यातील खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी पत्की यांच्याविषयीच्या तक्रारी पुराव्यांसह विधान परिषदेत सादर केल्या होत्या. या तक्रारींवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सभागृहात दिली.
काय होत्या तक्रारी?
पत्की यांच्याविरोधात आमदार रामदास कदम यांनी केलेल्या तक्रारींमध्ये खेड परिसरात अवैध मद्याच्या भट्ट्या चालू असल्याचे म्हटले होते. कोरोनाचे संकट असताना पत्की यांनी ‘डे-नाइट क्रिकेट’ स्पर्धेला अनुमती दिली. एका राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या. अशाप्रकारे राजकीय कार्यक्रमाला प्रशाकीय अधिकारी उपस्थित राहू शकत नाहीत. या कार्यक्रमाला मास्क न घालता उपस्थित राहिल्या असल्याचेही कदम यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. त्याविषयीचे कागदोपत्री पुरावे त्यांनी सभागृहात सादर केले.
आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा
पत्की यांच्याविरोधात यापूर्वीही गृहविभागाकडे तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. कारवाई न झाल्यास विधीमंडळाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा कदम यांनी सभागृहात दिला होता.
गृहमंत्र्यांकडून कारवाई
आमदार कदम यांनी दिलेल्या पुराव्यांविषयी माहिती घेऊन गृहमंत्र्यांनी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावरील कारवाईची घोषणा सभागृहात केली. याबाबत देशमुख सभागृहात म्हणाले, की खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याबाबत ज्या तक्रारी आल्या आहेत, त्यावरून त्यांची त्वरित जिल्ह्याच्या बाहेर बदली करून त्यांची चौकशी लावण्यात येईल.