रत्नागिरी - कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात अनेक तरुणांचा रोजगार गेला. मुंबईत कामाला असलेल्या कोकणी मुलांनी अखेर गावची वाट धरली. जिल्ह्यातील देगांव या गावातील विराज मोरे या उच्चशिक्षित तरुणानेही या लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावाकडे येत आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. विराजने 1 एकर जमिनीत हळद लागवड केली आहे. तर वर्षानुवर्षे ओसाड माळरानावरील 15 एकर जागेत 2 हजार आंबा, काजू, कोकमाच्या रोपांची लागवड केली आहे. या माध्यमातून त्याने बेरोजगारांच्या हाताला रोजगारही दिलाय.
टाळेबंदीच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र अशाही परिस्थितीत संधी साधत त्याने हे साध्य केलंय.
विराज हा उच्चशिक्षित असून त्याचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे. टाळेबंदीच्या काळात तो प्रथमच आपल्या देगांव या मूळ गावी आला होता. सतत कामात राहण्याची सवय असलेल्या विराजला टाळेबंदीचा सुरुवातीचा काळ खूपच असह्य करणारा होता. मात्र या काळावर मात करत त्यांनी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. गावातीलच काही तरुणांना सोबत घेऊन त्यांच्याही उदरनिर्वाहाची समस्या सोडवण्यासाठी शेतीचं सोनं केलं. कोकणातील पारंपारिक भात शेतीला फाटा देऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठचा विचार करून आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या कोकणच्या हळदीची लागवड त्याने सुरू केली.
त्याने एक एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली आहे. कोकणातल्या पारंपारिक शेतीसमोर अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाचा पर्याय त्याने शेतकऱ्यांना दिला आहे. या व्यतिरिक्त विराजने वर्षानुवर्षे ओसाड असलेल्या माळरानावरील 15 एकर जागेत 2 हजार आंबा, काजू, कोकमच्या रोपांची लागवड केली. हे सर्व करण्यासाठी साहजिकच कामगारांची आवश्यकता होती. त्यामुळे हाताला काम नसलेल्या मुलांना एकत्र आणत त्यांने रोजगार उपलब्ध केला. याशिवाय लॉकडाऊनमुळे नोकऱ्या जाऊन गावी परतलेल्या तरुणांना एकत्र घेऊन नंदनवन फुलवले आहे.