रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व प्रशासनाने दिलेल्या मृतांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. ही तफावत 93 मृतांची असून नेमके किती मृत पावले व कशामुळे मृत्यू झाला याची चौकशी होण्याची गरज आहे. वस्तुस्थिती लपवून आरोग्यमंत्र्यांची फसवणूक होत असेल, तर याची गांभीर्याने दखल घ्यावी. निलंबन करून मार्ग निघणार नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत तफावत -
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी 13 मृत्यू (एकूण मृत्यू 1239), 1 जून 7 (1246), 2 जून रोजी 8 (1254), 3 जून रोजी 8 (1262), 4 जूनला 16 (1278) आणि काल 5 जून रोजी 10 (1288) असे मृत्यू झाले आहेत. मात्र, या आकडेवारीत काहीतरी गोलमाल आहे. कारण दररोज होणारे मृत्यू व एकूण आकडेवारी यामध्ये 93 मृत्यूंचा फरक दिसताे. म्हणजेच 1 जूनला 1, 2 जूनला 5, 3 जूनला 17, 4 जूनला 28 आणि 5 जूनला 42 मृत्यू जास्त झालेले दिसत आहेत. म्हणजे एकूण मृत्यू 1288 नव्हे तर 1330 झाले आहेत. परंतु आकडेवारीमध्ये तफावत करून काय साध्य होणार आहे, असा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे. या आकड्यांबाबत अशी बनवाबनवी का केली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे अनिकेत पटवर्धन म्हणाले. आम्ही राजकारण करतो, अशी टीका सत्ताधार्यांकडून केली जात आहे. परंतु आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर रुग्ण, नातेवाइकांच्या समस्या जाणून घेत आहोत. अनेकांचे स्वॅब घेऊन 7 दिवस झाले तरी त्यांना मेसेज किंवा रिपोर्ट मिळालेला नाही. आकडेवारीत तफावत ठेवून लॉकडाऊन उठणार असेल तर आनंद आहे, असे ते म्हणाले.
'आरोग्य व्यवस्था उभारण्यात सत्ताधारी मंडळी अपयशी' -
गेले चार दिवस कडकलॉकडाऊन करूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. लॅबवरचा ताण कमी करण्यासाठी दुसरी लॅब उभारण्याची घोषणा अजूनतरी हवेतच आहे. आकडेवारी लपवण्यामागचे कारण काय? रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था उभारण्यात सत्ताधारी मंडळी अपयशी झाले आहेत. मग अधिकार्यांना अभय का दिले जाते? रत्नागिरी जिल्हा रेड झोनमधून कधी बाहेर पडणार? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचं पटवर्धन यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत काही जणांकडून समाजाला भडकवण्याचा काम - अजित पवार